कवठेकर प्रशालेत भक्ती, ज्ञान व संस्कृतीचा त्रिवेणी संगम: भव्य साक्षरता व पुस्तक दिंडी उत्साहात संपन्न!

StarMaharashtrasanchar 0

 



‘अवघे गरजे पंढरपूर । चालिला नामाचा गजर ॥’ या भक्तिमय वातावरणात आणि आषाढी वारीच्या पवित्र पार्श्वभूमीवर, पंढरपूर एज्युकेशन सोसायटीच्या अमृतमहोत्सवी कवठेकर प्रशालेत (नाथ चौक) एक अतिशय देखणा आणि प्रेरणादायी दिंडी सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.यावेळी महाराष्ट्र शासनाच्या ‘उल्लास नवभारत साक्षरता कार्यक्रम’ अंतर्गत शालेय स्तरावर ‘पुस्तक दिंडी’ आणि वारकरी संस्कृतीचा हा अनोखा संगम सोहळा अतिशय रसात व आनंदात पार पडला.

​कार्यक्रमाची सुरुवात प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. व्ही. वाय. पाटील सर यांच्या हस्ते पावन पालखी पूजनाने झाली. त्यानंतर उपमुख्याध्यापक श्री. आर. एस. कुलकर्णी सर यांनी सुरेल आरती गायन केले. या मंगल सोहळ्यामुळे संपूर्ण प्रशालेचा परिसर विठ्ठलममय आणि भक्तीभावाने न्हाऊन निघाला होता.

​सजीव संतमेळा, पुस्तक दिंडी आणि बाल वारकऱ्यांचा उत्साह शिगेला पोहोचला होता.

​या दिंडीत विद्यार्थ्यांनी केवळ वारकरी संप्रदायाचेच नव्हे, तर महाराष्ट्राचे वैचारिक, सामाजिक आणि सांस्कृतिक ऐक्य जपणारे सजीव रूप साकारले होते.

​या दिंडीत विद्यार्थ्यांनी श्री विठ्ठल-रुक्मिणी, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत मुक्ताई, संत नामदेव यांच्यासह क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि स्वातंत्र्यवीर सावरकर अशा ऐतिहासिक व आध्यात्मिक महापुरुषांच्या सजीव वेशभूषा परिधान केल्या होत्या. जणू साक्षात वैकुंठच आणि महाराष्ट्राचे विचारविश्वच प्रशालेच्या दिंडीत अवतरले होते.

​पुस्तक दिंडी)'उल्लास साक्षरता कार्यक्रमा'अंतर्गत विद्यार्थ्यांच्या हातात ज्ञानाची पुस्तके आणि डोक्यावर तुळशीवृंदावान होते, ज्याने शिक्षणाचे महत्त्व आणि भक्तीचा संदेश एकाच वेळी दिला.

​लाडक्या बाल वारकऱ्यांच्या हातातील चकाकणारे टाळ, विणेकऱ्यांची वीणा, मृदुंगाचा (पाखवाज) नाद आणि मुखात अखंड ‘ज्ञानोबा-तुकाराम’ चा जयघोष सुरू होता. एकसुरात आणि एकाच तालात पावले टाकत ही बालदिंडी अत्यंत प्रफुल्लित मनाने पुढे जात होती.

​

कवठेकर प्रशालेतून ​नाथ चौक मार्गे निघालेली ही भव्य दिंडी शहरातील चौफाळ्यापर्यंत मार्गस्थ झाली. या मार्गावर वाटेत अनेक वारकरी आणि नागरिकांनी या बाल संतांच्या रूपाचे व ‘पुस्तक दिंडी’चे दर्शन घेतले.

​या चालत्या-बोलत्या विठ्ठल-रखूमाईच्या व संतमेळ्याच्या रूपाला पाहताच पंढरीच्या वाटेवर जमलेल्या खऱ्याखुऱ्या वारकऱ्यांचे मन भरून आले.

​“आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंद असे अंग अंगी!”

​भक्तीच्या पारावर पोहोचलेले वारकरी या बालरूपी विठ्ठलापुढे आणि संतांपुढे नतमस्तक होऊन पायावर लोटागण घालू लागले; काहींचे हात भावविभोर होऊन पायावर टेकले, तर अनेकांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. सुरक्षेसाठी तैनात असलेले काही पोलीस अधिकारीदेखील या अलोट भक्तीचा आणि आनंदाचा क्षण आपल्या मोबाईलमध्ये सेल्फीच्या माध्यमातून कैद करत होते. लहानांपासून ते थोर वृद्धांपर्यंत साऱ्यांनीच हात जोडून, नतमस्तक होऊन या मंगल दिंडीचा आणि आनंदाचा सोहळा अक्षरशः डोळ्यात साठवून घेतला.

​यशस्वी नियोजन व सहकार्य:

​हा संपूर्ण दिंडी सोहळा अत्यंत नेटका आणि यशस्वी पार पाडण्यासाठी प्रशालेच्या शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले. यामध्ये ज्येष्ठ शिक्षक श्री. एन. जी. कुलकर्णी, श्री. राजूरकर, श्री. मेडशिंगकर, श्री. सुरेंद्र कुलकर्णी, श्री. गुरव, सौ. मोरे, सौ. एडगे, सौ. अल्लापूरकर, सौ. चुंबळकर आणि सौ. वळवी श्री थोरात यांनी दिंडीचे उत्तम व अचूक नियोजन केले.

​तर दिंडीच्या निमित्ताने आकर्षक आणि सुंदर चित्ररूपी फलक लेखन श्री. देवमारे, सौ. वसावे आणि सौ. दळवी यांनी केले.

​या आगळ्यावेगळ्या आणि सुसंस्कृत सोहळ्यामुळे संपूर्ण पंढरीच्या मातीमध्ये कवठेकर प्रशालेने भक्ती, ज्ञान, साक्षरता आणि संस्कारांचा एक नवा सुवर्णअध्याय लिहिला गेला.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

About Us

राज्य प्रवाह न्यूज पोर्टल मध्ये प्रसारित झालेल्या बातमीतील मते संबंधित पत्रकाराची किवा व्यक्तीची असून राज्य प्रवाह न्यूज चे संपादक / अथवा मालक हे त्या मतांशी सहमत असतीलच असे नाही.राज्य प्रवाह न्यूज मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात . बातमी व जाहिरातीतील मजकुराची वैधता राज्य प्रवाह न्यूज तपासून पाहू शकत नाही . बातमी व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार राज्य प्रवाह न्यूज नसून संबंधित पत्रकार किंवा जाहिरातदारच आहे.