भक्ती आणि शक्तीच्या पवित्र संगमभूमी असलेल्या पंढरपुरात देशभक्तीच्या मंजुळ सुरांनी एक नवा इतिहास रचला आहे. भारत विकास परिषद, शाखा पंढरपूर यांच्या वतीने आयोजित अत्यंत प्रतिष्ठित आणि देशभक्तीची भावना रुजविणाऱ्या 'भारत को जानो' (राष्ट्रीय समूहगान प्रतियोगिता) स्पर्धेत पंढरपूर येथील शिक्षण क्षेत्रात अग्रगण्य व नामांकित कवठेकर प्रशालेच्या विद्यार्थी कलाकारांनी आपल्या सुरेल स्वरांची मोहिनी घालत संपूर्ण तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. आपल्या अद्भूत आणि शिस्तबद्ध सादरीकरणाच्या जोरावर या संघाने पुणे येथील विभागीय स्तरावरील स्पर्धेसाठी दिमाखात मजल मारली आहे.
सुरांची लयबद्ध जुगलबंदी आणि मार्गदर्शकांचे बहुमूल्य योगदान
कवठेकर प्रशालेच्या प्रतिभावंत आठ कन्यांच्या संघाने राष्ट्रभक्तीपर गीतांच्या माध्यमातून उपस्थितांच्या अंगावर काटा आणला. सुरांची अचूक सांगड, शब्दांची स्पष्ट उच्चारफेक आणि तालावर असलेली मजबूत पकड यामुळे हा संघ तालुक्यात सर्वोत्कृष्ट व अव्वल ठरला. या दैदिप्यमान यशाच्या पाठीमागे श्री. केंगार व त्यांच्या सहकारीवृंदाचे अतिशय कसबी आणि तळमळीचे मार्गदर्शन लाभले आहे. तसेच, प्रशालेच्या शिक्षिका सौ. बिराजदार व इतर शिक्षकवृंदाच्या बहुमूल्य मार्गदर्शनाखाली विद्यार्थिनींनी हे यशाचे शिखर सर केले आहे.
या ऐतिहासिक यशाबद्दल आज प्रशालेच्या प्रांगणात विजयी चमूचा अत्यंत दिमाखदार सत्कार सोहळा संपन्न झाला. याप्रसंगी, पंढरपूर एज्युकेशन सोसायटीचे सचिव श्री. सु.र. पटवर्धन यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली.
"संगीत हे केवळ मनोरंजनाचे साधन नसून ते परमेश्वरासमीप नेणारे आणि मानवाला अलौकिक आत्मिक आनंद देणारे एक दिव्य माध्यम आहे. शैक्षणिक कार्यातही प्रभावी साधन म्हणून संगीत महत्त्वाची भूमिका बजावते,"
असे गौरवोद्गार त्यांनी काढले. तसेच, "कवठेकर प्रशालेने संगीताच्या या प्रांगणात आपल्या शिरपेचात आणखी एक नवा मानाचा तुरा रोवला आहे", अशी भावना व्यक्त करत त्यांनी या विजयी चमूचा प्रशालेच्या सर्व विद्यार्थ्यांच्या समोर व फटाक्यांच्या आतिषबाजी मध्ये सत्कार केला.
कवठेकर प्रशालेच्या या उत्तुंग यशाबद्दल पंढरपूर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्री. नानामालक कवठेकर, चेअरमन श्रीमती विणाताई जोशी तसेच सर्व सन्माननीय सदस्य व संचालक मंडळाने मनःपूर्वक आनंद व्यक्त केला आहे.
या सत्कार व कौतुक सोहळ्यास प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. व्ही. वाय. पाटील, उपमुख्याध्यापक श्री. आर. एस. कुलकर्णी, पर्यवेक्षक श्री. एम. बी. गडदे तसेच ज्येष्ठ शिक्षक श्री.एन. जी.कुलकर्णी व समस्त शिक्षक व शिक्षकेतर बंधू-भगिनी उपस्थित होते. आगामी पुणे येथील विभागीय स्तरावरील चुरशीच्या स्पर्धेसाठी कवठेकर प्रशालेचा हा यशस्वी संघ असाच विजयश्री संपादन करेल, असा दृढ विश्वास व्यक्त करत सर्व शिक्षक बंधू-भगिनी, शिक्षकेतर कर्मचारी आणि संस्था सदस्यांनी विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सकाळ-सत्रेचे जेष्ठ शिक्षक श्री मेडसिंगकर यांनी अत्यंत प्रभावीपणे केले

