आत्मविश्वासाचा 'सार्थक' विजय पुनर्मूल्यांकनानंतर
द. ह. कवठेकरचा सार्थक लेंगरे राज्यात सर्वप्रथम
पंढरपूर एज्युकेशन सोसायटीच्या द.ह. कवठेकर प्रशालेने शैक्षणिक क्षेत्रात पुन्हा एकदा उत्तुंग भरारी घेतली आहे. एसएससी मार्च २०२६ च्या परीक्षेत ९९.२० टक्के गुण मिळवून कौतुकाचा विषय ठरलेल्या चि सार्थक सिद्धेश्वर लेंगरे या जिद्दी विद्यार्थ्याने पुनर्मूल्यांकनानंतर थेट 'शत प्रतिशत' (१०० टक्के) गुणांचा पल्ला गाठत राज्याच्या गुणवत्ता यादीत प्रथम स्थान पटकावले आहे. सार्थकच्या या 'सार्थक' यशाने पंढरपूरसह संपूर्ण जिल्ह्याचा नावलौकिक उंचावला आहे.
आत्मविश्वासाची ही खेळी 'सार्थकी' ठरली आहे.इयत्ता १० वी परीक्षेत ९९.२० टक्के गुण मिळाल्यानंतरही सार्थकला आपल्या अभ्यासावर आणि गुणवत्तेवर पूर्ण विश्वास होता. या आत्मविश्वासाच्या बळावर त्याने एस.एस.सी. बोर्डाच्या उत्तरपत्रिकांची प्रत मिळवून तज्ज्ञ विषयशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली पुनर्मूल्यांकन करून घेतले. या प्रक्रियेत त्याच्या इंग्रजी विषयात २, विज्ञानात २ आणि भूगोलात १ असे एकूण ५ गुण वाढले आणि तो थेट शंभर टक्के गुणांसह राज्याच्या प्रथम स्थानाच्या शिखरावर विराजमान झाला.
एकाच प्रशालेचे दोन 'सुवर्णपदकवीर'
विशेष म्हणजे, याच प्रशालेचा विद्यार्थी अथर्व अमित वाडेकर याने यापूर्वीच १०० टक्के गुणांसह राज्यात प्रथम येण्याचा बहुमान प्राप्त केला होता. आता सार्थक लेंगरेच्या यशामुळे द.ह. कवठेकर प्रशालेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. एकाच प्रशालेचे दोन विद्यार्थी राज्याच्या गुणवत्ता यादीत अव्वल स्थानी झळकल्याची ही घटना शैक्षणिक वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे. तसेच, प्रशालेतील तब्बल ३६ विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळवून प्रशालेची शैक्षणिक परंपरा अधिक उज्वल केली आहे.
सार्थकचे वडील सिद्धेश्वर लेंगरे आणि आई राणी लेंगरे हे जिल्हा परिषदेत शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. शैक्षणिक आणि सामाजिक कार्यात नेहमीच तत्पर असलेल्या या शिक्षक दांपत्याच्या संस्कारातूनच सार्थकला अभ्यासाची गोडी लागली. आपल्या पुत्राच्या या यशाने लेंगरे कुटुंबात आनंदाचे उधाण आले असून, त्यांनी सार्थकच्या मेहनतीचे फळ आज मिळाल्याची भावना व्यक्त केली.
या ऐतिहासिक यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष नाना मालक कवठेकर,चेअरमन श्रीमती वीणाताई जोशी,सचिव श्री. सु.र.पटवर्धन, श्री सु. त्रि. अभ्यंकर,मुख्याध्यापक श्री. वि. मा. कुलकर्णी, उपमुख्याध्यापिका सौ.विश्वासे आणि पर्यवेक्षक श्री. शेलार यांनी सार्थकचे विशेष कौतुक केले आहे. या यशाने द.ह. कवठेकर प्रशालेत उत्साहाचे व आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, सर्वत्र सार्थकावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

