📍 #मुंबई |
शिवसेनेचा दसरा मेळावा आज गोरेगावच्या नेस्को मैदानावर पार पडला. यंदाचा दसरा पूरग्रस्तांचे अश्रू पुसून साजरा करण्याचे आवाहन मी राज्यभरातील शिवसैनिकांना केले होते. त्यामुळे मेळाव्याला सुरुवात करण्यापूर्वी शिवसेनेच्या वतीने पूरग्रस्तांकरिता पाठवण्यात येणाऱ्या मदतीच्या ट्रक्सना भगवा झेंडा दाखवून अतिवृष्टीग्रस्त भागाकडे रवाना करण्यात आले.
यंदा बळीराजाचे दुःख मोठे आहे. मात्र अशा परिस्थितीत त्यांच्या मदतीचा हात देणे आपले कर्तव्य असल्याचे सांगितले. 'जिथे संकट तिथे हा एकनाथ शिंदे प्रकट' हे समीकरण असून यावेळीही शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांचे दुःख पाहिले असल्याचे याप्रसंगी नमूद केले.
या महापुराच्या तडाख्यात बळीराजा कोलमडला असला तरीही सरकार त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहील. अटी शर्ती बाजूला ठेवून त्याला मदतीचा हात दिला जाईल अशी ग्वाही देखील यावेळी दिली. काहीही झाले तरी शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही असेही याप्रसंगी अधोरेखित केले.
शिवसैनिकांना केलेल्या आवाहनानुसार त्यांनी या पूरग्रस्तांच्या मदतीला धावून जात त्यांचे घर पुन्हा सावरण्याचा प्रयत्न केला. अशा शिवसैनिकांचा मला सार्थ अभिमान असल्याचे यावेळी सांगितले. पूरग्रस्त शेतकऱ्यांना २६ प्रकारच्या वस्तू दिल्या असून, ज्यांनी साधा बिस्किटाचा पुडा दिला नाही ते आमच्यावर टीका करत असल्याचे मत याप्रसंगी व्यक्त केले.
मी कायम देण्याचे काम केले असून, लाखो शिवसैनिकांचे हात माझेच आहेत. बाळासाहेबांचे विचार ही माझी संपत्ती आहे. आम्ही अडीच वर्षे केलेल्या कामाच्या बळावर महायुतीचे २३२ आमदार निवडून आले असल्याचे यावेळी सांगितले. पीएम केअरची भाषा करणाऱ्यांनी कोरोना काळात स्वतः ६०० कोटी जमा करून एक रुपयाची मदत देखील कुणाला केली नाही.
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्यांना पंतप्रधान मोदीजी यांनी जशास तसे उत्तर दिले. तर आपल्याच सैन्याच्या शौर्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करून पाकिस्तानला हेडलाईन्स देण्याचे काम तुम्ही केलेत, त्यामुळे तुमचा मेळावा पाकिस्तानमध्ये व्हायला हवा होता अशी टीका याप्रसंगी केली. पाकिस्तानचे झेंडे नाचवणारे, आतंकवाद्यांकडून प्रचार करून घेणारे, त्यांच्या कबरी सजवणारे तुमचे हिंदुत्व हे बेगडी असल्याचा घणाघात केला.
पक्षाच्या कार्यकर्त्यांना संपवण्याचे काम तुम्ही केलेत त्यामुळे पक्षप्रमुख नव्हे तुम्ही 'कट' प्रमुख आहात. त्यामुळे आगामी निवडणुकीनंतर तुमची सावली देखील तुमच्यासोबत राहील की नाही सांगता येत नाही असे सांगितले.
तसेच राज्यातील पूरग्रस्त भागातील शेतकऱ्यांना त्यांचा मुलामुलींची लग्न लावून देण्यास अडचणी आल्यास ही जबाबदारी #शिवसेना घेईल असे यावेळी जाहीर केले, तसेच आगामी वर्ष हे वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुखांचे जन्म शताब्दी वर्ष असल्याने वर्षभर हा जन्मशताब्दी महोत्सव साजरा केला जाईल असेही याप्रसंगी सांगितले. आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या निवडणुका असल्याने प्रत्येक संस्थेवर महायुतीचा भगवा झेंडा फडकवण्यासाठी सज्ज रहावे असे आवाहन याप्रसंगी शिवसैनिकांना केले.
यावेळी माजी आमदार राजन तेली आणि माजी आमदार अण्णासाहेब माने यांनी शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केला.
यावेळी शिवसेनेचे सर्व प्रमुख नेते, मंत्री, उपनेते, सचिव, आमदार आणि प्रमुख पदाधिकारी तसेच एमएमआर क्षेत्रातील शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
#Shivsena #दसरामेळावा #EknathShinde #Maharashtra

